" थिएटर ऑफ़ रेलेवंस " नाट्यदर्शन ने दिले उत्सवाला वैचारिक आणि कलात्मक दृष्टिकोन !!
" थिएटर ऑफ रेलेवंस " हे कलेचे महासागर आहे ते का , ह्याचा अनुभव ह्या नवरात्रीत आला...नवरात्री म्हंटली कि डीजे , दांडिया , मौज मस्ती , झगमगाट , मोठमोठ्या देवीच्या मुर्त्या , त्यावर चमचमणारे दागिने आणि श्रद्धेत , व्रतवैकल्यामध्ये , नवरात्रीचे नऊ रंग अगदी आवर्जून त्याचे अनुसरण करणारे भक्तजन... ह्या सगळ्यांमध्ये तत्व , विचार , सात्विकता , कलात्मकता , वैचारिक दृष्टी हे शब्द नाहीसेच झाले , नाही का ??? मोठे सामाजिक कार्यकर्ते , राजकीय कार्यकर्ते अश्या वेळी अगदी मनापासून जनतेचा विचार करून त्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतात... आणि हे कार्य सलग 9 दिवस + दसरा अगदी सातत्याने सुरु असते... अश्या वेळी " थिएटर ऑफ रेलेवंस " चे अभ्यासक आणि कलासाधक उत्सवाला एक वैचारिक आणि कलात्मक दृष्टिकोन प्रदान करतात..!
आम्ही , " थिएटर ऑफ रेलेवंस " नाट्य दर्शनाचे कलासाधक , उत्सवाला एक कलात्मक दृष्टी देण्याकरिता वेगवेगळ्या लोकांशी थेट जाऊन संवाद केला.. हा संवाद राजकीय कार्यकर्ते , सामाजिक कार्यकर्ते , संस्थेतील अधिकारी आणि सामान्य जनते सोबत साधला... निष्कर्ष असा कि जागतिक रंगचिंतक आणि " थिएटर ऑफ रेलेवंस " चे जनक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक " मैं औरत हूँ " चे चार प्रयोग निश्चित झाले... 27 (सिवुड्स , नवी मुंबई ) , 28 (घणसोली , नवी मुंबई ) , आणि 29 (२ प्रयोग सिवुड्स , नवी मुंबई ) सेप्टेंबर 2017 असे तीन दिवस सातत्याने आम्ही प्रयोग करणार आहोत हे ऐकूनच फार आनंद झाला.. ह्या आनंदाला विचार आणि संकल्पनेची जोड होती.. प्रस्थापित रंगभूमीवरील कलाकार , लेखक , दिग्दर्शक , निर्माते हे प्रसिद्धीकरणाच्या नादात contract shows करतात , नऊ दिवसाचे नऊ रंग अनुसरून त्याची जाहिरात करतात म्हणजेच वस्तूकरण पर्यंत स्वतःला मर्यादित करतात , सुपार्या घेतात किंवा कलेच्या नावावर व्यक्तिवादाला पुढे नेतात... " थिएटर ऑफ रेलेवंस " च्या रंगकर्मींनी हीच मानसिकता मोडीत काढली आहे आणि जनतेला कलेचे खरे रूप म्हणजेच सकारात्मक आणि रचनात्मक परिवर्तन दाखवले आहे..
" मैं औरत हूँ " ह्या नाटकाची प्रस्तावना अशी कि स्त्री ने तिच्या अस्तित्वाचा शोध घ्यावा , स्वतःला शरीरा पलीकडे एक सृजनात्मक व्यक्तित्व म्हणून पाहावं आणि ह्या पितृसत्तात्मक समाजात स्वतःचा निर्णय घेऊन आपली जागा कायम करावी... नवरात्री मध्ये आपण सगळेच देवीला पुजतो , तिच्या शक्तीचा उदो उदो करतो , तिची अंतःकरतून सेवा करतो परंतु हे केवळ त्या मूर्ती पर्यंतच सीमित का ??? अजूनही आपल्या देशात महिलेला द्वितीय नागरिकत्व आहे , समान नाही असे का ??? हा प्रश्न केवळ मलाच नाही तर माझ्या सोबत वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला यावा आणि म्हणून हे नाटक आम्ही नवरात्री उत्सवात करायचे ठरवले...
ह्या प्रयोगांचे आयोजन करतांना आम्ही दरवेळी संकल्पनात्मकपणे स्पष्ट होत गेलो , आयोजकाची भूमिका स्पष्ट होत गेली , अधिकाऱ्यांना भेटण्याचे उद्देश्य काय व आपण कुठल्या शब्दात आपले संप्रेषण करणार आहोत हे ठरत गेले , आपण कलाकार आहोत आपली भूमिका तठस्त आहे म्हणून कुठल्याच राजकीय , सामाजिक , संगठनात्मक पक्षावर अवलंबून राहायचे नाही हे समजत गेले... आणि मानसिक परिवर्तनाचा कलात्मक पाया आम्ही तयार करत गेलो !! आम्ही कलाकार म्हणून केवळ नाटकच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत नव्हतो तर थिएटर ऑफ रेलेवंस चे अभ्यासक म्हणून नाटकाच्या माध्यमातून संकल्पना सुद्धा स्पष्ट करत होतो... नाटकाच्या प्रत्येक प्रस्तुती नंतर प्रेक्षकांचे हुंदके , त्यांचा अभिप्राय , त्यांची मनोवस्था ते रंगमंचावर येऊन सांगत.. खरंच रंगमंचावर आल्याने एक वेगळीच ऊर्जा आपल्यात संचारते ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला...
नाटकाची सुरुवात " हम हैं " पासून व्हायची.. हा नारा एक सशक्त आवाज आहे आपल्या असण्याचा जो मंजुल सरांनी स्वतः दिला आहे... एकात्मकतेचा आवाज वातावरणात अगदी ऊर्जेचा संचार करायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायचा... नाटक संपन्न झाल्यावर प्रेक्षकांशी सवांद साधला जायचा... 'समाजातील पितृसत्तामक मानसिकतीकतेमुळे स्रीवर होणारे अत्याचार ह्यांचे तंतोतंत माहिती ह्या नाटकातून मिळालेली आहे' , 'मुझे अंदर से बहुत घुटन मेहसूस हो रही थी' , ' 'ह्या नाट्यप्रस्तुतीने पुन्हा एकदा मला माझ्या बद्दल विचार करायला प्रेरित केले आहे' असे प्रतिसाद आम्हाला केवळ महिलां कडूनच नाही तर पुरुषांकडून सुद्धा मिळाले..आणि इथेच समानता दिसते कि थिएटर ऑफ रेलेवंस अंतर्गत नाटक "मैं औरत हूँ " हे महिलांना सक्षम करतेच त्याच बरोबर समाजात जगणाऱ्या प्रत्येक मानवाला ते आपलेसे वाटते..
आतापर्यंत माझी वेगळी ओळख मी स्वतः माझ्यासाठी निर्माण केलीच होती , त्यानंतर ती परिवारात पसरली आणि आता ती समाजात ठोस स्वरूपात निर्माण होत आहे... हा प्रवास इथेच नाही थांबत... आता विचारांचा शोधात असलेल्या ह्या माणसांना एक मार्ग सापडला आहे... बदल नक्की होणार हा विश्वास निर्माण झालेला आहे... माझी विचारांची उंची आणि स्वतःवरचा विश्वास आता दिसू लागला आहे... ह्या विश्वासाला कायम ठेवण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे... असेच सातत्याने कलात्मक रंगकर्म करून , आम्ही " थिएटर ऑफ रेलेवंस " नाट्यप्रक्रियेच्या मार्ग अवलंबून एक सकारात्मक आणि तात्विक परिवर्तन घडवणार आहोत ...
Theatre Of Relevance Practitioner and Performer
Komal Khamkar
komalkhamkar08@gmail.com






No comments:
Post a Comment