Saturday, 16 February 2019

जीवनाला रंगदृष्टी प्रदान करणारा विचारमंच..

जीवनाला रंगदृष्टी प्रदान करणारा विचारमंच..


आदिकाळापासून संवाद प्रक्रियेची शैली म्हणजे –Performing Art... आयुष्यात घडलेल्या घटना अभिनय, नृत्य, संगीत, चित्रकला किंवा विविध कलाकृतींच्या माध्यमातून समूहाला सांगण्यात यायच्या.. म्हणजेच कलेचा मूळ हेतू हा जीवनाचा अर्थ शोधण्यात, समजण्यात आणि संवाद करण्यात होता.. पण जसजसा काळ पुढे सरकला तसतशी कलाही सोयीनुसार साचेबद्ध होत गेली... कलेचा मूळ हेतू - “संवाद” हरवला, आणि उरले निव्वळ प्रदर्शन.. अश्या या खरेदी विक्रीच्या काळात कलेचे सत्व टिकवणे अत्यंत आव्हानात्मक आणि आवश्यक आहे आणि म्हणूनच रंगमाचाला “विचारमंचा” चे स्वरूप देऊन 12 ऑगस्ट 1992 रोजी रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी कलेचे मूळ उद्देश्य लक्षात ठेऊन “थिएटर ऑफ रेलेवंस” रंगसिद्धांताला जन्म दिला.

“थिएटर ऑफ रेलेवंस” एक असे रंगचिंतन आहे ज्याने थिएटरच्या माध्यमातून जीवनातले रेलेवन्स शोधले, आणि प्रेक्षकांमध्ये वैचारिक मंथनाला सुरुवात केली... ज्याने थिएटरला साचेबद्ध चौकटीतून उन्मुक्त केले आणि समाजात परिवर्तन आणण्याचे सशक्त मध्यम बनवले.. "थिएटर ऑफ रेलेवंस"हे केवळ नाट्यतत्वा पर्यंत मर्यादित  नसून जीवनाला कलात्मक दृष्टी देणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेने नाटकाला मनोरंजनाच्या चौकटीच्या बाहेर, परिवर्तनाचे एक सशक्त माध्यम म्हणून पाहिले आहे.. आणि हे परिवर्तन आधी स्वतःत, परिवारात आणि मग समाजात केले, ज्यामुळे प्रत्येक जनसामान्याला "परिवर्तन" आपली गरज वाटू लागली.. जिथे परिवर्तन हा केवळ शब्द न राहता एक सशक्त अनुभव, सकारात्मक दृष्टिकोन आणि ठोस पुरावा आहे ज्याला प्रत्येकजण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, अनुभवू शकतो, त्याला मोजू शकतो.. 

परिवर्तन तेव्हाच घडतं जेव्हा प्रस्थापित प्रवाहाच्या विरोधात वाटचाल करण्याची दृष्टी आणि जिद्द असते..आणि ही दृष्टी अपल्याला सत्वाची अनुभूती देते.. असेच सातत्याने रचनात्मक दृष्टी निर्माण करणारे "थिएटर ऑफ रेलेवन्स" चे रंगचिंतक आणि रंगअभ्यासक जिद्दीने, स्थापित प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहून आपल्या कलात्मक आणि वैचारिक ऊर्जेने स्वतःचे अस्तित्व घडवण्याच्या प्रक्रियेत आहेत.. आणि आपल्यातल्या सत्वाचा एक कलात्मक सोहळा म्हणून सातत्याने "थिएटर ऑफ रेलेवन्स  उन्मुक्ततेचे 25 वर्ष" च्या निमित्ताने "तीन दिवसीय कलात्मक नाट्यमहोत्सव" आयोजित करत आहेत..

"काळाला" धरून रहाणारी "कला" म्हणजे थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यप्रक्रिया..या नाट्यमहोत्सवाचे उद्देश्यच आहे - संवाद, आजच्या काळाशी.. नाटकाची पहिली भूमिका आहे संवाद साधणे, हा संवाद प्रेक्षाकांना आणि कलाकारांना एकमेकांबद्दल व एकमेकांसाठी विचार करण्यास प्रेरित करतो.. परंतु आता रंगभूमीची चौकट आखल्यामुळे कलाकार स्टेज पर्यंत मर्यादित राहतात आणि प्रेक्षक टाळ्या वाजवण्यापर्यंत.. इथे थिएटर ऑफ रेलेवन्स प्रक्रिया प्रेक्षक आणि कलाकारांमधली दरी भरून काढते आणि प्रेक्षक हा सर्वप्रथम आणि सशक्त रंगकर्मी आहे हा विश्वास निर्माण करते जेणेकरून प्रेक्षक नाटकाच्या प्रस्तुति नंतर रंगमंचावर येऊन संवाद साधतात आणि आपली भूमिका व दृष्टी स्पष्ट करतात... 

या नाट्यमहोत्सवात 3 कलात्मक आणि क्लासिक नाटकांची प्रस्तुति होते - "गर्भ" , "अनहद नाद - Unheard Sounds of Universe" आणि "न्याय के भंवर में भंवरी" ज्यांची संकल्पना निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी केले आहे. या तिन्ही नाटकांमधील, कलाकार कुठल्याही ठराविक भूमिकांमध्ये न राहता स्वतःच्या अभिनय कौशल्याने विचारांचे सौंदर्य प्रस्तुत करतात.. बबली रावत, अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर आणि तुषार म्हस्के सातत्याने कलेची साधना करत, काळाला एक नवीन वैचारिक दृष्टिकोन देण्याकरिता प्रतिबद्ध आहेत. प्रत्येक कलाकार आपल्या नाटकातल्या तत्वांना व्यवहारीकतेत आणतो आणि त्याचे प्रमाण प्रेक्षकांनी देऊन सत्व निर्माण होते, हे या प्रक्रियेचे वैशिष्ठ्य आहे. 



"गर्भ" नाटकाने माणसातल्या माणूसकीचा संदेश दिला आहे.. जसं आपण आईच्या गर्भातून बाहेर पडून शारीरिक जन्म घेतो तसंच आपण समाजाने विणलेल्या गर्भातून बाहेर पडून आपले अस्तित्व घडवतो आणि वैचारिक जन्म घेतो.. स्पर्श आणि स्पंदन या दोन तत्वांनी माणूस जन्माला येतो, आणि कालांतराने ही तत्व शुष्क होत जातात आणि उरतं फक्त हाडामांसाचं शरीर, जे जड होऊन समाजासाठी आणि स्वतःसाठी घातक ठरतं. प्रकृतीचा नियमच आहे की 9 महिने 9 दिवसाच्या कालावधी नंतर बाळाला गर्भाच्या बाहेर येणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक माणसाने  माणूसकीला बंदीस्त करणारे कोष तोडून वेळेत बाहेर पडणे अनिवार्य आहे नाहीतर समाज आणि व्यक्ती दोघांचा अंत निश्चित! या कोषांना तोडण्याचा संघर्ष आणि या संघर्षातून निर्माण होणारी आशा म्हणजे नाटक "गर्भ"..



"अनहाद नाद - Unheard Sounds of Universe" या नाटकाने कलाकारांना त्यांच्यातील सात्विकतेची आणि कलात्मक शक्तीची ओळख करून दिली..कला आणि कलाकार हे प्रॉडक्ट नाही आणि कला म्हणजे मजुरी करणे नव्हे...या नाटकाने कलाकारांचा अंर्तध्वनी सशक्त करून त्यांना उन्मुक्त केले आहे आणि प्रत्येक कलाकाराला त्यांच्या स्वतंत्र सकारात्मक विचारांचे मालक बनवले आहे. अंर्तनाद ऐकण्याची प्रक्रिया सुरू होते सजग असण्या पासून आणि सजग असण्याचे लक्षण म्हणजेच सजीव असणे.. 



"न्याय के भंवर में भंवरी" या नाटकात स्त्री आणि पुरुषाच्या समानतेवर भाष्य केले आहे.. समानता, एका न्यायसंगत व्यवस्थेच्या निर्माणासाठीचा केलेला वैचारिक लढा.. पितृसत्तेवर वैचारिक प्रहार.... या व्यवस्थेत पितृसत्ता कशी रुजली आणि समाजावर त्याचा होणारा परिणाम, याचे निदान करणारी एक कलात्मक प्रस्तुती... 

या तिन्ही नाटकांची प्रस्तुति दिल्ली , मुंबई , पनवेल मध्ये संपन्न झाल्यानंतर आता ठाणे गडकरी रंगायतन मध्ये 27, 28, 29 मार्च 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहेत. 



27 मार्च या वैश्विक रंगमंच दिवशी, थिएटर ऑफ रेलेवन्स कलात्मक नाट्य महोत्सवाचा शुभारंभ होत आहे.. हा एक स्थानिक पासून जागतिक स्तराशी जोडणारा प्रयोग आहे की ज्यात संवादाच्या माध्यमातून जनमानसात एका वैचारिक प्रक्रियेची सुरुवात होईल आणि प्रत्येक जीवन हे किती कलात्मक आणि मानवीय आहे ही दृष्टी प्रदान करेल..एक कलात्मक पाऊल वैचारिक चळवळीसाठी... 

थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी आणि अभ्यासक

कोमल खामकर

No comments:

Post a Comment